सूर्यालाही प्रकाशमान करणारे सुश्रुताचार्य
सूर्यालाही प्रकाशमान करणारे सुश्रुताचार्य
Blog #3 in series of #10 reasons why
Acharya Sushruta is called the Father of surgery?
सुमारे २००० वर्षापूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर
आणूया. सर्वसामान्यतः वयाची ६० वर्षे ओलांडली की अशा ज्येष्ठ नागरिकांची दृष्टी
धूसर व्हायला लागे. हि व्यक्ती स्वतःचे काम करण्यास हळू हळू अक्षम होऊ लागे, साध्या
नित्यनियमाच्या कार्यांकरीताही अन्य व्यक्तींवर त्यांना विसंबून राहावे लागत असे. हि
सर्व परिस्थिती होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे मोतीबिंदू [Cataract] ज्याला सुश्रुताचार्यांनी लिंगनाश/नीलिका/काच
या नावाने उल्लेखित केले आहे.
हळू हळू होणा-या मात्र दिवसागणिक वाढत जाणा-या दृष्टीदोषामुळे शरीराने सशक्त असलेल्या व्यक्तीला अंशतः किंवा पूर्णतः अंधत्व प्राप्त होई. पूर्वीच्या समाजाच्या दृष्टीकोनातून अशी व्यक्ती म्हणजे जणू परावलंबी भार अशी अवस्था होत असे. वाढत्या वयोमानानुसार नैसर्गिक रित्या शरीरामधील घडणा-या बदलांपैकी एक बदल म्हणजे हा मोतीबिंदू [Cataract]. आजही या विकृतीवर केवळ आणि केवळ शस्त्रकर्माने इलाज केला जात असून; जालीम, हुकुमी प्रतिबंधात्मक औषधी स्वरूपातील तोडगा शोधण्यावर शास्त्रज्ञांचे परिश्रम सुरु आहेत. त्या काळी अशा परावलंबित्व निर्माण करणा-या आजारावर अभ्यास करून यशस्वीपणे शस्त्रकर्म करण्याचे कौशल्य सुश्रुताचार्यांनी संपादित केले होते. हा मोतीबिंदू होतो तरी कसा, त्यावर कोणती चिकित्सा दिली जाते आणि त्यामधील सुश्रुतांचे योगदान कोणते ते पुढे पाहू.
मोतीबिंदू [Cataract] म्हणजे काय?
डोळ्यांपर्यंत पोहोचणारा प्रकाश [खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे] डोळ्यातील Lens म्हणजेच भिंगामधून परावर्तीत होतो आणि त्याची छाया दृष्टीपटलावर पडतो, retina, optic nerve, optic chiasma असी मजल-दरमजल करत मेंदूपर्यंत पोगोचते आणि मग आपल्याला हि वस्तू दिसते.
वाढत्या वयोमानानुसार नैसर्गिक रित्या शरीरामधील घडणा-या बदलांमुळे हि lens म्हणजे भिंग जी पूर्वी पारदर्शक असते ती अर्धपारदर्शक किंवा अपारदर्शक होते. याचाच परिणाम म्हणून नेत्रापटलावर उमटणारी छाया हि अस्पष्ट, धूसर बनते.
आणि जसजसे हे भिंग अर्धपारदर्शक कडून अपारदर्शक
बनते तसतशी दृष्टी अजून बिघडते. यावर वेळीच उपाय न केल्यास व्यक्ती पूर्णतः अंध बनू
शकतो.
सुश्रुत संहितेनुसार मोतीबिंदू वर्णन-
रुणाद्धि सर्वतो दृष्टीं लिंगनाशः स उच्यते |
तस्मिन्नपि तमोभूते नातिरूढे महागदे||
- सु. उ. 7/16
ज्यावेळी शरीरातील दोष दृष्टीमध्ये येतात व
अवरोधित होतात त्यावेळी तीव्र प्रकाश असलेल्या सूर्य, चंद्र, वीज अशा वस्तूही धूसर दिसतात [म्हणजेच
सर्वसामान्य वस्तू दिसणे हे अत्यंत अवघड होते, दृष्टी मंद होते] अशा आजाराला लिंगनाश/नीलिका/काच
असे म्हणाले जाते.
शस्त्रकर्म योग्य व यशस्वी रित्या पार
पाडण्यासाठी शस्त्रकर्माच्या मुळ क्रीयेएवढेच महत्व त्याच्या पूर्वतयारीला आणि
शस्त्रकर्म झाल्यावर जखम पूर्ण भरेपर्यंत रुग्णसुश्रुषा करण्याच्या सर्व क्रियांना
आहे. हे मर्म ओळखून सुश्रुतांनी हे शस्त्रकर्म पूर्वकर्म [पूर्वतयारी], प्रधान
कर्म [मूळ शस्त्रक्रिया], आणि पश्चात कर्म [जखम पूर्ण भरेपर्यंत रुग्णसुश्रुषा
करण्याच्या सर्व क्रिया] अशा तीन टप्प्यांमध्ये विभागले आहे.
पूर्वकर्म [पूर्वतयारी]
- रुग्णाची यथायोग्य तपासणी करावी
- दोष व व्याधी याचे योग्य निदान करावे
- दोष व व्याधीच्या अनुरूप चिकित्सेत शस्त्रकर्म आवश्यक आहे का?
याची निश्चिती करावी. कारण या सर्वांचा सारासार विचार न करता अयोग्य
व्यक्तीला शस्त्रकर्म केल्यास रक्तस्त्राव जास्त होतो, दृष्टी बाधा उत्पन्न होते किंवा दृष्टी जाते.
[सु.उ. 17/71,72]
- आयुर्वेदानुसार कोणतेही व्याधी वात पित्त कफ या तीन दोषांच्या
विषमतेनुसार निर्माण होतात त्या अनुषंगाने वमन, विरेचन, नस्य,
स्नेहन, स्वेदन, तर्पण इत्यादी पंचकर्मानी
रुग्णाच्या शरीरातील दोष बाहेर काढावे. या पश्चात रुग्णास शस्त्रकर्मास सज्ज
होण्यास सांगावे.
लिंगनाशाची शस्त्रकर्म चिकित्सा प्रधान कर्म [मूळ शस्त्रक्रिया]
- रुग्ण स्थिती – शस्त्रकर्माच्या दिवशी या रुग्णाला लंघन द्यावे.
- सुसज्जता – योग्य त्या दिवशी शस्त्रमंदिर व
सर्व उपकरणे सुसज्ज ठेवावी.
- रुग्णास पूर्वेकडे तोंड करुन, स्वस्तिवाचन करून. मान किंचित वर करून पाठीवर
झोपवावे. रुग्ण सहाय्यकाने डोके हलणार नाही अशा पद्धतीत स्थिर पकडावे.
प्रधान शस्त्रकर्म
- हाताचा कंप होणार नाही याची सावधानता बाळगून डोळ्यामध्ये विशिष्ट ठिकाणी शस्त्रवेधन करावे. नेत्रामध्ये वेधान केलेले शस्त्र अशापद्धतीने फिरवावे की नेत्र भिंगाचा भाग त्याच्या मूळ स्थानातून विलग होईल. या कृतीमुळे धूसर भिंगातून डोळ्यामध्ये प्रकाश पोहोचणेस जो अडथळा येत असतो तो दूर होतो आणि लख्ख प्रकाश डोळ्यात आतपर्यंत पोहोचल्याने रुग्णाची दृष्टी पुन्हा प्राप्त होते. त्याला सर्व वस्तू दिसू लागतात. सूर्याचे झाकोळलेले तेजही अधिक प्रकाशमान होते.
आजही केल्या जाणा-या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा
मूळ उद्देश हे अपारदर्शक नेत्र भिंग काढणे किंवा स्वच्छ करणे हाच आहे. संदर्भ – Cataract surgery- Wikipedia:- During cataract surgery, a
patient's cloudy natural cataract lens is removed, either by emulsification in
place or by cutting it out.
- योग्य पद्धतीने दोष निर्मूलन केल्यानंतर जखमेवर योग्य अशा औषधांनी व्रणकर्म करावे.
पश्चात कर्म [शस्त्रकर्म पश्चात
घेण्याची काळजी ]
- रुग्णाचा आहार हळू हळू वाढवावा व जखम
भरण्याच्या उद्धेशाने योग्य औषधी चिकित्सा द्यावी.
- डोळ्याची जखम पूर्ण भरेपर्यंत तीव्रतेने खोकणे,
शिंकणे, थुंकणे, पोटावर [पालथे] झोपणे, तीक्ष्ण प्रकाशाकडे किंवा
सुक्ष्म वस्तूंकडे पाहणे या गोष्टी टाळाव्या.
आधुनिक नेत्र शल्यकर्माशी साधर्म्य
Pre-operative
evaluation रुग्ण शस्त्रकर्म करण्याजोगा आहे का याची तपासणी व खात्री करणे, मोतीबिंदू
खेरीज असलेल्या अन्य नेत्र विकृतीमध्ये हे शल्यकर्म न करणे, प्रत्येक गोष्ट
सुयोग्य काळजी [proper
caution and stepwise approach] घेऊन पार पाडणे, संज्ञाहरण [या विशिष्ठ शल्यकर्माच्या श्लोकामध्ये जरी संज्ञाहरणाविषयी उल्लेख
नसला तरी सर्वच शल्यकर्मांपूर्वी संज्ञाहरण केले जात असे असे गृहीतच आहे],
रुग्णाची स्थिती [position of patient], श्स्त्रकर्मापूर्वी लंघन [Nil by mouth- NBM], नेत्र वेधन [incision], शल्यकर्म [Couching procedure], व्रणकर्म [post-operative wound care & dressing], व्रण भरण्याकरिता
औषधोपचार व काळजी या बहुतांशी सर्वच प्रक्रिया या 1965 पर्यंत सारख्या
होत्या. 1966 पासून आलेल्या
नवीन Phacoemulsification
पद्धतीने करण्यात आलेल्या सहज, कमी दुष्परिणाम असलेली सुलभ पद्धत
विकसित झाल्यामुळे वरील वर्णीत Couching procedure चा वापर कमी होत गेला. परंतु आजही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या
आफ्रिका मधिल काही ठिकाणी सुश्रुतानी वर्णिलेली नेत्र शल्य चिकित्सा आजही अवलंबिली
जाते.
या सर्व वर्णनामधून आपल्याला निश्चित म्हणता येईल की इसवीसनपूर्व
काळात एवढा प्रगल्भ विचार व कमालीचे शस्त्रकर्म कौशल्य सुश्रुताचार्यांनी संपादित
केले होते व यशस्वीपण रुग्ण चिकित्सा केली होती. म्हणूनच त्यांना संपूर्ण जगभरात
मानाने म्हणविले जाते Father of Surgery. आणि असे हे
सुश्रुताचार्य बनवितात आयुर्वेदाला OMG Amazing Ayurveda…!
Comments